Wednesday, March 3, 2021

वृक्ष, आपण आणि आपला स्वार्थ

     नमस्कार.   सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपणा सर्वांना सकाळी तोरण लावताना आंब्याच्या पानांची तसेच संध्याकाळी सोनं म्हणून शमी, आपट्याच्या पानांची आठवण आलीच असेल! आज सकाळी आमच्या सोसायटी मधील सर्व मुले एकाच आंब्याच्या झाडाखाली पाने जमा करण्यासाठी जमली होती तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, झाडांची आपण फक्त ठराविक वेळीच आठवण काढतो किंवा ज्या झाडांचा आपण फक्त स्वार्थासाठी च वापर करतो त्या झाडांचा आपण इतर वेळी कधी विचार का बरे करत नाही..? आंब्याची पाने भेटली नाही की ' आपल्या आजूबाजूला झाडेचं नाहीत ' एवढे बोलून आपण मोकळे होतो व हताश होतो. पण तीच झाडे लावण्याचा विचार आपल्या मनात का नाही येत? मुळात आपली संस्कृती ही फक्त निसर्गा मुळेच टिकून आहे तरी त्या निसर्गाचे रक्षण करण्याचा विचार का नाही येत आपल्या मनात? कोणी तरी सांगितले की आपले ' झाडे लावा झाडे जगवा ' वगेरे सुरू होतं त्यातही आमच्या कडे जागा नाही, वेळ नाही किंवा इतर काही कारणे देणारा वर्गही असतोच म्हणा. परंतु एखादी गोष्ट निश्चितपणे करायची असे ठरवल्यानंतर ती होतेच फक्त पाहिजे ती इच्छाशक्ती कारण ' इच्छा तिथे मार्ग '. मी काय म्हणतो या वेळी एक झाड लावून तर बघा. हा.. फक्त स्वतःचा विचार थोडासा बाजूला ठेऊन आपल्या भावी पिढी साठी का होईना. मी तर लावलं  बुआ! कारण ही पृथ्वी आपली माता आहे आणि ती तिच्या पुत्रांकडे मदतीसाठी हाथ पुढे करत आहे तिचे रक्षण करण्यासाठी. लक्षात ठेवा आपल्याकडे राहण्यायोग्य दुसरा ग्रह नाही आहे. 

                                                        - देशपांडे ऋग्वेद रविंद्र

                                                                     संभाजीनगर

मराठी राजभाषा व मी


        #HAPPY MARATHI RAJBHASHA DAY

    Happy Marathi Rajbhasha Day to all. वरील ओळ वाचून आपण म्हणाल की अरे हा वेडा-बिडा झालाय की काय?? मराठी भाषा दिनाच्याच शुभेच्छा इंग्रजी मधून देतोय. पण मी ही आपल्या सारखाच वागतोय बरका..! नाही म्हणजे, आजकाल सर्व सण-उत्सवांच्या शुभेच्छा इंग्रजीतूनच देण्याची नवी पद्धत रुजू झाली आहे . हा ती करण्यामागे आपलेच योगदान आहे ही बाब वेगळी. आज मी देखील त्याचाच एक भाग झालो त्यात वाईट काय...?  
     'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' हे "मराठी भाषा अभिमान गीत" आपण गातो खरें पण, आपल्याला आपल्या मातृभाषा मराठीचा खरंच गर्व, अभिमान वाटतो का? आपण का आपल्याच राज्यात आपलीच भाषा सोडून बोलतो? आता आपल्याला वाटेल काहीही काय बोलतो पण विचार करा आपण दिवसात कितीदा अनावश्यक ठिकाणी हिंदीचा वापर करतो ते. एखादा परप्रांतीय व्यक्ती ज्याचं अक्खं आयुष्य माझ्या महाराष्ट्रातच गेलं त्याला मराठी येणारंच यात काही वैर नाही. परंतु आपण त्याच्याशी बोलताना त्याच्या भाषेत सुरुवात करतो, तो का कधी तुमच्याशी मराठीत बोलतो? जर तो त्याची भाषा सोडत नाही तर आपण तरी का हो?
     फक्त आजच्याच दिवशी व ते पण फक्त 'व्हाट्सअप्प स्टेटस' ठेवण्यासाठी नका ना मराठीचा आदर बाळगू. आदर आपल्या दैनंदिन जीवनात बाळगा, तो आपल्या आचरणात आणा. नाहीतर- "एक ज़माने में मराठी नामक भाषा इस देश मे बोली जाती थी" असं आपल्यालाच सांगावं लागेल! म्हणून आपली मातृभाषा जपा, तिचा अभिमान बाळगा, तिच्यावर प्रेम करा. अन्यथा श्री सुरेश भटांच्याच ओळींप्रमाणे "पाहुणे असंख्य जरी पोसते मराठी, आपल्याच घरात हाल सोसते मराठी" आणि याचे कारणही आपणच बनू! बघा विचार करून. 

      शेवटी गर्वाने म्हणा-"होय मला अभिमान आहे माझ्या मराठी असण्याचा. मी मराठी म्हणून जन्मलो व आजन्म मराठी म्हणूनच राहीन.

                                जय महाराष्ट्र!

   किमान आज तरी मराठीतच बोला।
(वर कामाच्या ठिकाणा व्यतिरिक्त अनावश्यक पणे बोलल्या जाणाऱ्या हिंदी व इंग्रजी चा उल्लेख आहे) 

                                                             -देशपांडे ऋग्वेद रविंद्र
                                                                      संभाजीनगर