Sunday, May 9, 2021

जननी...

 सदरील लेखात मी आई व मातृत्व या बद्दल च्या माझ्या भावना काही तुटक्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करीत आहे कारण फक्त आजच्या दिवस फोटो टाकून शुभेच्छा देण्यापेक्षा मला हा मार्ग जास्त चांगला वाटला! माझ्या भावना मी शब्दांत व्यवस्थित जरी व्यक्त करू नसलो शकलो तरी लिहिताना भावना अनावर मात्र नक्कीच झाल्या........"

      आई, तू मला समजूनच घेत नाहीस! जाss मला तुझ्याशी बोलायचंच नाहीए!!" साधारणतः माझ्याच वयाचा एक मुलगा त्याच्या आईबद्दल तक्रार करत होता. सतत काही ना काही तक्रार करणे ही आता त्याची नित्याचीच बाब झालेली होती; परंतू शेवटी ते मातेचं काळीज तिच्या परीनं ते मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होतं.....

    मूल व त्याच्या आईचं नातं हे असंच काहीसं कधी भांडणारं, चिडणारं तर क्षणार्धात "आई तुझ्याशिवाय माझं कसं ग होईल?" या विचाराने घट्ट मिठी मारणारं असावं हा माझा विचार आहे. पण तिचा विचार कधी केला जातो का? बाळाच्या जन्मापासून ते तिच्या हयातीपर्यंत प्रत्येक गोष्टीत 'आई' चा फारच मोठा वाटा असतो तरी सुद्धा बऱ्याच अंशी या सर्वाचा शेवट एखाद्या वृद्धाश्रमात होतो. मी आई वर चिडतो, भांडतो कारण आपण आपल्याच तंद्रीत असतो, या नादात आपण शब्दाचे असे काही बाण (हो बाणच) सोडतो जे आईला हृदयात खोल वर घाव करून जातात आणि जे कधी भरल्या जातीलचं असे नाही... मी बोलून विसरून जातो पण आई साठी त्या गोष्टी फार वेदनादायी ठरतात. पण आई सोबतचा प्रत्येक चांगला वा वाईट क्षण दरवेळी नवीन खूप काही शिकवून जातो. माणूस नसल्यावरच त्याची किंमत कळते यास माझी जरा सहमती नाही; कारण क्षणोक्षणी आईचे अस्तित्व तिची अनमोल अशी किंमत दाखवून जाते. जर आईने आपल्याला समजून घ्यावे अशी आपली भूमिका असते तर आपणही तिला समजून घेतो का? व आपल्या अश्या वागण्याचा तिला किती त्रास होत असेल नाही! आपल्यासाठी सर्वकाही करूनही "तू माझ्यासाठी काहीच करत/केले नाहीस" असे बोलून आपण मोकळे होतो. तिच्या आपल्या कडून असलेल्या अपेक्षा, इच्छा-आकांशा आपण आपल्याच विश्वात वावरताना सपशेल विसरून जातो, नाही का?
आई खरंच या बद्दल मला माफ कर.
आयुष्याच्या वाटेवर टप्प्याटप्प्यावर बाळाला जन्म देणारी, वाढवणारी आई, त्याच्यावर माया करणारी आत्या, लाड करणारी मावशी, गोष्टी सांगणारी आजी व या सोबतच पोषण करणारी 'भू'माता, दूध देणारी 'गो'माता, सुनेला मदत करणारी सासू, नदी,पृथ्वी, इ. अश्या विविध रुपांतून आपल्याला आईचे दर्शन घडत राहते. भारत हा आपला असा एकमेव देश आहे ज्यात निर्जीव गोष्टींना सुद्धा मातेचा दर्जा दिलेला दिसून येतो, या वरून आपल्या संस्कृतीत असलेला आई बद्दल चा आदर, प्रेम भाव जाणवतो. जन्मदात्र्या आईसोबतच सर्व काही देणारी आपली भारत माता. तिचा प्रत्यक्ष समोरासमोर जरी अनुभव नसला येत तरीही तिचं आपल्यासारख्या तिच्या असंख्य लेकरांवर अतीव प्रेम आहे हा; पण ते समजण्यासाठी तुमचंही तिच्यावर तेवढंच प्रेम असणं देखील आवश्यक आहे बरं! सुजलाम सुफलाम अशी आपली भारतमाता. आपण म्हणतो ना की 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी' म्हणजे आई व मातृभूमी स्वर्गापेक्षा महान असतात. भारतमातेचे प्रेमळ, वात्सल्यपूर्ण रूप हे आपल्या आईपेक्षा निश्चितच वेगळे नाही फक्त ते समजायला हवे. हे ऋण कधीही न फेडण्यासारखेच होय!
     मातृप्रेम हे जरी निस्वार्थ असलं तरी वरील सर्व मातांचं मातृऋण हे फेडावंच लागतं व प्रत्येक आईसाठी आपला तिच्यासाठी वापरलेला प्रेमाचा एक शब्द देखील फार मोठी करामत करून जाऊ शकतो. माणूस हा फक्त प्रेमाच्या शब्दांचा भुकेला असतो व आई ही जरी 'सुपरवुमन' असली तरी माणूसच आहे. आपले प्रेमाचे शब्द आईची सर्व दुःखे विसरवू शकतात. आई आपल्या कळत नकळत एवढे काही करून जाते की त्यासमोर एक लेख लिहिताना देखील माझे शब्द फुटत नाहीत फक्त गहिवरून येते....
आई-मुलाच्या नात्यावरील श्यामची आई वा कवी यशवंत यांची कविता वाचताना अश्रू अनावर होतात. पण त्यांच्या सारख्या माझ्या भावना मी व्यक्त नाही करू शकणार परंतु प्रयत्न नक्कीच करू शकतो........

शेवटी कवी यशवंत यांच्या कवितेच्या काही ओळी,

'आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी
ती हाक येइ कानी । मज होय शोककारी
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.

शेवटी मला मातृतुल्य अश्या सर्व व्यक्तींना मातृदिनाच्या मनापासून शुभेच्छा देऊन नमस्कार करतो.

                                                          -  ऋग्वेद रविंद्र देशपांडे
                                                                    संभाजीनगर 

Wednesday, March 3, 2021

वृक्ष, आपण आणि आपला स्वार्थ

     नमस्कार.   सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपणा सर्वांना सकाळी तोरण लावताना आंब्याच्या पानांची तसेच संध्याकाळी सोनं म्हणून शमी, आपट्याच्या पानांची आठवण आलीच असेल! आज सकाळी आमच्या सोसायटी मधील सर्व मुले एकाच आंब्याच्या झाडाखाली पाने जमा करण्यासाठी जमली होती तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, झाडांची आपण फक्त ठराविक वेळीच आठवण काढतो किंवा ज्या झाडांचा आपण फक्त स्वार्थासाठी च वापर करतो त्या झाडांचा आपण इतर वेळी कधी विचार का बरे करत नाही..? आंब्याची पाने भेटली नाही की ' आपल्या आजूबाजूला झाडेचं नाहीत ' एवढे बोलून आपण मोकळे होतो व हताश होतो. पण तीच झाडे लावण्याचा विचार आपल्या मनात का नाही येत? मुळात आपली संस्कृती ही फक्त निसर्गा मुळेच टिकून आहे तरी त्या निसर्गाचे रक्षण करण्याचा विचार का नाही येत आपल्या मनात? कोणी तरी सांगितले की आपले ' झाडे लावा झाडे जगवा ' वगेरे सुरू होतं त्यातही आमच्या कडे जागा नाही, वेळ नाही किंवा इतर काही कारणे देणारा वर्गही असतोच म्हणा. परंतु एखादी गोष्ट निश्चितपणे करायची असे ठरवल्यानंतर ती होतेच फक्त पाहिजे ती इच्छाशक्ती कारण ' इच्छा तिथे मार्ग '. मी काय म्हणतो या वेळी एक झाड लावून तर बघा. हा.. फक्त स्वतःचा विचार थोडासा बाजूला ठेऊन आपल्या भावी पिढी साठी का होईना. मी तर लावलं  बुआ! कारण ही पृथ्वी आपली माता आहे आणि ती तिच्या पुत्रांकडे मदतीसाठी हाथ पुढे करत आहे तिचे रक्षण करण्यासाठी. लक्षात ठेवा आपल्याकडे राहण्यायोग्य दुसरा ग्रह नाही आहे. 

                                                        - देशपांडे ऋग्वेद रविंद्र

                                                                     संभाजीनगर

मराठी राजभाषा व मी


        #HAPPY MARATHI RAJBHASHA DAY

    Happy Marathi Rajbhasha Day to all. वरील ओळ वाचून आपण म्हणाल की अरे हा वेडा-बिडा झालाय की काय?? मराठी भाषा दिनाच्याच शुभेच्छा इंग्रजी मधून देतोय. पण मी ही आपल्या सारखाच वागतोय बरका..! नाही म्हणजे, आजकाल सर्व सण-उत्सवांच्या शुभेच्छा इंग्रजीतूनच देण्याची नवी पद्धत रुजू झाली आहे . हा ती करण्यामागे आपलेच योगदान आहे ही बाब वेगळी. आज मी देखील त्याचाच एक भाग झालो त्यात वाईट काय...?  
     'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' हे "मराठी भाषा अभिमान गीत" आपण गातो खरें पण, आपल्याला आपल्या मातृभाषा मराठीचा खरंच गर्व, अभिमान वाटतो का? आपण का आपल्याच राज्यात आपलीच भाषा सोडून बोलतो? आता आपल्याला वाटेल काहीही काय बोलतो पण विचार करा आपण दिवसात कितीदा अनावश्यक ठिकाणी हिंदीचा वापर करतो ते. एखादा परप्रांतीय व्यक्ती ज्याचं अक्खं आयुष्य माझ्या महाराष्ट्रातच गेलं त्याला मराठी येणारंच यात काही वैर नाही. परंतु आपण त्याच्याशी बोलताना त्याच्या भाषेत सुरुवात करतो, तो का कधी तुमच्याशी मराठीत बोलतो? जर तो त्याची भाषा सोडत नाही तर आपण तरी का हो?
     फक्त आजच्याच दिवशी व ते पण फक्त 'व्हाट्सअप्प स्टेटस' ठेवण्यासाठी नका ना मराठीचा आदर बाळगू. आदर आपल्या दैनंदिन जीवनात बाळगा, तो आपल्या आचरणात आणा. नाहीतर- "एक ज़माने में मराठी नामक भाषा इस देश मे बोली जाती थी" असं आपल्यालाच सांगावं लागेल! म्हणून आपली मातृभाषा जपा, तिचा अभिमान बाळगा, तिच्यावर प्रेम करा. अन्यथा श्री सुरेश भटांच्याच ओळींप्रमाणे "पाहुणे असंख्य जरी पोसते मराठी, आपल्याच घरात हाल सोसते मराठी" आणि याचे कारणही आपणच बनू! बघा विचार करून. 

      शेवटी गर्वाने म्हणा-"होय मला अभिमान आहे माझ्या मराठी असण्याचा. मी मराठी म्हणून जन्मलो व आजन्म मराठी म्हणूनच राहीन.

                                जय महाराष्ट्र!

   किमान आज तरी मराठीतच बोला।
(वर कामाच्या ठिकाणा व्यतिरिक्त अनावश्यक पणे बोलल्या जाणाऱ्या हिंदी व इंग्रजी चा उल्लेख आहे) 

                                                             -देशपांडे ऋग्वेद रविंद्र
                                                                      संभाजीनगर